Writings

सुरांच्यात रमणं!

(Read more)

दर बुधवारी नेहमीप्रमाणे आमच्या पुण्याच्या घरात सतारीचा क्लास सुरू होता. हार्मोनी स्कूल ऑफ सितार ही आमची म्हणजे बाबांनी सुरू केलेली सतारीची/संगीताची शाळा. सकाळी लवकर उठून सव्वासहा वाजताच तळेगावचं घर सोडायचं आणि सात वाजता सगळ्यांच्या आधी येऊन पिण्याचं पाणी वगैरे भरून सतार लावायची. मग सात वाजले की पहिला विद्यार्थी येतो. आणि मग सुरूच होतं. सात ते बारा कोण कोण येत असतात. सतारीवरच्या प्रेमामुळे आणि संगीत शिकण्याच्या स्फूर्तीमुळे आमचा क्लास दिवसभर सुरू असतो. मध्ये थोडा वेळ दुपारचं जेवण, आराम आणि पुन्हा संध्याकाळी खूप रियाज, खूप शिक्षण, लोक येऊन गेले तरी मी असतेच दिवसभर.
असाच सकाळचा क्लास संपला आणि मला ‘लोकप्रभासाठी लिहिशील का?’ म्हणून फोन आला. ‘तुला पाहिजे तो विषय निवड आणि थोडंसं लिही,’ असंही मला सांगण्यात आलं. मला मजा वाटली आणि ठरवलं प्रयत्न तर करू.
‘‘माझे वडील सतार वाजवतात’’ हे सांगताना मला लहानपणीसुद्धा खूप अभिमान वाटायचा. कारण असं म्हटलं की सगळ्यांचेच डोळे चमकत, आश्चर्य आणि उत्सुकता वाटे लोकांना! मी तेव्हा गाण्यांच्या क्लासला जायचे. शाळेत असताना गाणं, कथ्थक हे दोन्ही क्लासेस जवळजवळ दहावी संपेपर्यंत चालू होते. मला कधी कधी मजा म्हणून सतार हातात धरल्याचं आठवतं, पण रियाज-शिक्षण असं काही कॉलेजला जाईपर्यंत पक्कं ठरवलं नव्हतं. अमेरिकेतून हायस्कूल संपवून मी जेव्हा परत आले, तेव्हा मात्र आपोआप सतार शिकायलाच सुरुवात झाली. बाबांनी पुण्यात क्लास घ्यायला सुरुवात केली होती आणि मीसुद्धा क्लासमध्ये बसून सुरूच केलं वाजवणं- फार चर्चा, बोलणं, करू का नको असा काही विचार करायच्या आत! सगळे एकत्र मनापासून खणखणीत रियाज करत आणि एकत्र रियाजात तर खूपच गंमत वाटायची. एकदा मी मुंबईत गेले होते. एकटीच. एफवायला असताना. माझी मैत्रीण राहायची पाल्र्यात. तेव्हा बाबांनी फोनवर सांगितलं की ‘‘नेहरू सेंटरमध्ये किशोरीताईंचा (गानसरस्वती किशोरी अमोणकर) कार्यक्रम आहे. तू जा- मी सांगतो तुला प्रवेश द्यायला आतमध्ये.’’ पावसाळा होता तेव्हा. प्रचंड पाऊस पडत होता. त्या दिवशी मला आणखीनच उत्साह आला. इतका सुंदर पाऊस, मी एकटी पावसातून जाणार आणि एक संगीताची मैफल ऐकणार! मी आनंदात, भिजत रिक्षातून निघाले. नेहरू सेंटरमध्ये पोहोचले तेव्हा चक्क ओली किच्च झाले होते. अंगावरचे कपडे निथळून आत गेले. माझी सीट शोधली आणि अचानक एसीमध्ये आल्यामुळे कुडकुडत बसले. थोडा उशीरच झाला होता मला.
गेल्या गेल्या लगेचच पडदा उघडला. त्या दिवशीचं स्टेजवरचं दृश्य हे माझ्या आयुष्यातलं सर्वात अविस्मरणीय! अंधाऱ्या, थंड प्रेक्षागृहमध्ये फक्त स्टेजवर पिवळसर मंद प्रकाश, किशोरीताई सोनेरी काठांची काळी साडी नेसून स्टेजच्या मध्यभागी बसलेल्या, दोन उंच तंबोरे, पेटी, व्हायोलिन, तबला असे सगळे साथीदार बसलेले.
तंबोऱ्याच्या आवाजाने आणि वाद्यांची जुळवाजुळव करत असतानाच्या सुरांनी माझी थंडी कमी होत होती. काहीतरी अद्वितीय पाहतोय आपण, अचानक रात्री खूप चांदण्या आकाशात दिसल्यावर वाटतं तसं असं वाटलं. ताईंनी भूप गायला सुरुवात केली आणि मला रडूच यायला लागलं.
Alice in wonderland.
जेव्हा त्या बिळातून आत पडली असेल- तसं खोल खोल कुठेतरी चाललोय आपण, काहीतरी सुंदर आणि अद्भूत ऐकत- असं वाटत होतं. माझ्या भिजलेपणाचा पूर्ण विसर पडला होता. कार्यक्रम संपला आणि कितीतरी वेळ मला सीटमधून उठावंसंच वाटत नव्हतं.
पण उठले, परतीची ट्रेन पकडली आणि खिडकीतून बाहेर बघत असताना स्वत:लाच म्हणाले, आता मनापासून सतार शिकणार.
मला पण कधीतरी अनुभवयाचं आहे, असं सुरांच्यात रमणं!

दयाळाची गोष्ट

(Read more)

आज सूर्यकिरणांनी हळुवार उठवलं. उन्हाळा नक्की निघून गेलाय आणि पाऊस कुठल्याही क्षणी सुरू होईल असं निळं आभाळ माझ्या खिडकीतून दिसतंय. वाऱ्यामुळे पानं अस्वस्थ होऊन सळसळ करताहेत.
मी उठून कॉफी ठेवली आणि बाहेर दयाळाचं घरटं बघायला गेले. आमच्या दारात पितमोहोराचा मोठा वृक्ष आहे. त्यावर माझ्या काकाने बनवलेलं लाकडी (बर्ड हाऊस) खिळ्याने ठोकून लावून घेतलंय. अनेक चिमण्या आणि खारी इथे आनंदात राहून गेले आहेत. पक्ष्यांना आयतं घर जरी मिळत असलं, तरी प्रत्येक पक्षी आपल्या आवडीच्या गवताची बैठक करतोच आतमध्ये. मध्ये एक दयाळाचं जोडपंसुद्धा राहून गेलं या घरात. आम्ही त्यांना मिस्टर आणि मिसेस दयाळ म्हणायचो. कित्येक वेळा आई सहजपणे म्हणत – जा, मिसेस दयाळसाठी पाणी ठेव आपल्या लाकडी वाटीत.
आम्ही जिथे जेवायला बसतो, त्या टेबलावरून खिडकीच्या बाहेरची बाग दिसते. त्याबरोबर ते घरंपण. खारी आणि कावळ्यांची भांडणं मी अनेकदा जेवताना पाहिली आहेत.
त्या पक्ष्यांचं नियमित उठणं, भिरभिरत खाणं शोधणं, मनसोक्त गाणं आणि दुपारी शांतपणे फांदीवर बसून एकटक आकाशाकडे बघत राहणं मला अनुभवायला आवडतं. मुंबईहून घरी आल्यावर मला हे पक्षी भेटले की जवळचे मित्र-मैत्रिणी भेटल्यासारखा आनंद होतो. चहा पित मी त्यांच्या आयुष्याची चौकशी करत असते. ते खूप व्यग्र आहोत अशा थाटात त्यांचं त्यांचं जगत असतात. पिवळे धोबी व छोटेसे सूर्यक्षी त्यांच्या इवल्याशा चोचीत मोठ्ठी आळी घेऊन जाताना बघायला मजा वाटते.
दयाळ मात्र नियमित दिसणाऱ्या पक्ष्यांपैकी एक. पराग काका म्हणजे पराग महाजन, माझा काका – जो डॉक्टर आहे पण त्याहीपेक्षा प्राणी, पक्षी, झाडं ह्यंच्यावर त्याचं मनापासून प्रेम आहे. त्याची बियॉण्ड वाइल्ड नावाची संस्थासुद्धा आहे पुण्यात. तर पराग काकाने मला एकदा सांगितलं की दयाळ हा शब्द हिंदी कथा दहीयाळवरून आला. गुळगुळीत काळ्या पंखांवर दह्यचे शिंतोडे उडाल्यासारखे त्याचे सुंदर काळे- पांढरे पंख दिसतात- म्हणून दहीयाळ. Carl linnaeus (कार्ल लिनिए) नावाच्या एका दिग्गज वनस्पतीशास्त्रज्ञाने मग दयाळवरून ‘dial’ हा इंग्रजी शब्द शोधला. आणि दयाळाचं इंग्रजी नामकरण करण्यात आलं. ‘solaris’ त्याच्या ‘sun-dial’ या अर्थावरून. मात्र लिहिताना काहीतरी गोंधळ झाला आणि त्याने solaris च्या ऐवजी saularis असं लिहिलं. आता पुन्हा हिंदी भाषिक लोकांनी त्याचा वेगळा अर्थ लावला. ‘सौ लहरी’वरून आलं असणार ‘salauris’ आणि सौ लहरी म्हणजे शंभर सूर! म्हणजे असा शंभर गाणी गाणारा हा दयाळ!
आमच्याकडच्या मिसेस दयाळांना मी तिच्या पिल्लाला खाऊ घालताना बघितल्याचं आठवतं. मागच्या चिक्कूच्या झाडाखाली आईने सेंद्रिय खत करण्यासाठी दोन मोठे ड्रम ठेवले आहेत. तिथे बऱ्याच छोटय़ा अळ्या आणि किडे सापडतात. म्हणजे दयाळांची मेजवानीच. मिसेस दयाळ छोटय़ा-छोटय़ा उडय़ा मारत अळीची शिकार करत आणि क्षणभर अळी चोचीत ठेवून उडय़ा मारत पिल्लाकडे जात. अळीची चुळबुळ थोडी कमी झाली की किंचाळत लाल तोंडाचा मोठ्ठा ‘आ’ करून बसलेल्या पिल्लाच्या तोंडात ती अळी ठेवत.
मि. दयाळ मात्र जास्वंदीच्या फांदीवर बसून गाणी म्हणतात. रियाज करताना एकदा- दोनदा मिस्टर दयाळांनी साथसुद्धा केली आहे मला.
घरात पाहुणे आले की आम्ही आवर्जून ओळख करून देतो. हे आमचे मिस्टर आणि मिसेस दयाळ. मागे एक जांभळाचे झाड आहे. थोडीशी जांभळं आपल्यासाठी आणि बाकी सगळी पक्ष्यांसाठी असा विचार करूनच लावलेलं ते झाड. आंब्याच्या झाडावर बसलेला कोकीळ तर जीव ओतून कमालीच्या चिकाटीने गाणं म्हणत बसतो. आमची भांडणंसुद्धा होतात कधी कधी. मी ओरडून रागावते त्याला- अरे गप्प बैस जरा वेळ, यायचं असतं तिला तर आली असती एव्हाना. मला शांतपणे काम करू दे माझं! मग बाबा त्याची बाजू घेऊन मला ओरडत- त्याच्याशी भांडू नकोस उगाच! असे आमचे लाडावलेले आणि लाडके घरचे पक्षी.
गेले काही दिवस पुन्हा एका दयाळीणीने पिल्लं दिली त्या लाकडी घरात. बरेच दिवस त्यांच्या स्वागताची तयारी सुरू होती. पिल्लांचं पोट भरण्यासाठी तिचे कष्टही वाढले होते.
मला खूप वेळा मनात येऊन जातं की किती मऊ स्पर्श असेल तिच्या सुंदर दही उडवलेल्या काळ्या पंखांचा. मग मी गवतावरून हात फिरवते आणि कल्पना करते की असाच असेल काहीसा तो स्पर्श. Amelie नावाचा एक फ्रेंच चित्रपट आहे- ज्यात ह्य स्पर्शाचं आकर्षण असलेली ती अभिनेत्री आहे. वाण्याच्या दुकानात गेलं की तांदळाच्या पोत्यात बोटं खुपसणं तिला खूप आवडतं. मलाही खूप आवडतं. गाईच्या जिभेचा खरखरीतपणा, कणीक मळतानाचा चिकट-घट्टपणा, आई-बाबांच्या वापरलेल्या कपडय़ांचा मऊपणा आणि आता लिहिताना जाणवतंय की माझ्या मित्र-मैत्रिणी आणि जवळच्या लोकांच्या कोपरांचा स्पर्श मला खूप आवडतो- कधी तो खरखरीत असतो, पण काही लोकांचा इतका मऊ आणि गुळगुळीत! असो.
आज मी उठले आणि कॉफी घेऊन बाहेर गेले. दयाळ तिच्या नेहमीच्या जागेवर नव्हती. पिल्लासाठी खाऊ शोधत असेल. येईलच थोडय़ा वेळात म्हणून मी बागेत खुर्ची टाकून बसले. कॉफीचा घोट घेतल्यावर मला एक छोटासा फिक्या करडय़ा रंगाचा पंख गुलाबाच्या झाडात अडकलेला दिसला. मी थोडी जवळ गेले आणि पाहिलं तर खूप सारे पंख विखरून पडले होते गुलाबापाशी. काळे गुळगुळीत, काही दह्याचे शिंतोडे उडलेले काळे-पांढरे.. हे नक्की दयाळीचेच पंख. पण ते असे विखरून का पडलेत? परत घरटय़ाकडे बघितलं – काहीच हालचाल दिसेना. कुठे गेले सगळे? मी ते पंख वेचले आणि एकदाचा दयाळाच्या पंखांचा स्पर्श अनुभवला. पण असा? असा नव्हता अनुभवयाचा मला तो स्पर्श. येईल ना ती परत?

माझ्या दोन शाळा – नेहा महाजन

(Read more)

मी सोळा वर्षांची असताना पहिल्यांदा अमेरिकेत गेले. त्याआधी दहावीपर्यंत तळेगावच्या बालविकास विद्यालयात शिकले. सकाळी लवकर तयार होऊन ओढय़ाच्या रस्त्याने फुलपाखरांमागे पळत मी आणि दादा शाळेत जायचो. बाबा आम्हाला सोडायला यायचे. बाबाही शिट्टी वाजवत, गात पुढे चालत. कधी कधी मी आणि दादा जोरात पळत पुढे जाऊन पुन्हा मागे बाबांकडे येत असू. थोडं मोठं झाल्यावर आजोबा त्यांच्या कायनेटिकवर सोडायला येत. माझे आजोबा कविता करायचे. एकदा पावसाळ्यात आजोबा मारुती व्हॅनने सोडायला आले. मी दप्तर घेऊन बाहेर आले आणि घराकडे बघत आजोबांना म्हणाले, ‘‘आपण घरासाठी एक मोठ्ठी छत्री करायची का पावसाळ्यात?’’ आजोबांना इतकं आवडलं होतं ते, की कौतुकाने अनेक लोकांना, डोळ्यात पाणी येऊन ते हा प्रसंग सांगत. मी आणि दादा मात्र आजोबांची नक्कल करत असू. ओठ हालवत डोळ्यात पाणी येऊन आजोबा कोणाला तरी किरकोळ प्रसंग सांगताहेत याची गंमत वाटायची. आमची शाळेत जातानाची मन:स्थिती आनंदी आणि उत्साही ठेवण्यासाठी किती सुंदर क्षण निर्माण होत असत.
आमची शाळा छोटी आणि साधी होती. आमच्या गावातील दोन इंग्रजी शाळांमधली आमची पहिली! आम्ही मुलं-मुली आठवीपर्यंत एकत्र बसायचो. शिक्षकांबरोबर खूप मोकळीक असायची. चप्पल वर्गात सोडून धुळीत खेळणंसुद्धा चालायचं.
वर्गात कोणाचं कोणावर प्रेम जडलं तर त्यांना खूप त्रास द्यायचो. सतत चिडवणं, कोणी दोघं चुकून नजरानजरी करताना पकडले गेले तर अख्खा वर्ग कितीतरी वेळ आरडाओरडा करायचा. मलाही एक मुलगा आवडायचा आणि त्याला मी. मी शाळेची व्हाइस कॅप्टन होते. माझं काम असायचं प्रत्येक वर्गात खडू पोहोचवणं. एकदा त्याच्या वर्गात मी गेले तेव्हा फक्त लाल आणि निळे खडू ठेवले, कारण मी ‘ब्ल्यू हाउस’ आणि तो ‘रेड हाउस’मध्ये होता. त्याला कळलं होतं बहुतेक. खडू बघून तो हसला होता. आम्ही कधीच फार एकमेकांशी बोललो नाही.
अकरावीत मी एकदम अमेरिकेच्या शाळेत! अकरावीसाठी फग्र्युसन कॉलेजमध्ये गेले आणि अमेरिकन फिल्ड सव्‍‌र्हिसची शिष्यवृत्ती मिळाली. एक वर्ष अमेरिकेत शिकायला निघालेले. आईने माझ्यासाठी ‘एट हिअर लिआर्टस’ हा पोलोनिअसने लिआर्टसला ‘हॅम्लेट’ या नाटकामध्ये केलेला सुंदर उपदेश मराठीत भाषांतर करून दिला होता. वाचून दाखवताना रडलीही होती. माझ्या दादाच्या डोळ्यात पाणी पाहिल्यावर वेगळंच वाटलं होतं. माझ्याबरोबर खेळणारा, मज्जा करणारा, भांडणारा दादा मी जाणार म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी! मी खरंतर इतकी उत्साहात होते की जेव्हा खरंच विमानतळावर मला आई, बाबा, दादा काचेतून टाटा करताना दिसले, तेव्हा मला अचानक रडू फुटलं होतं. तोपर्यंत कुठेतरी लांब जाण्याच्या आनंदात होते.
माझी टेक्सासमधल्या शाळेत गेल्यावर हॅरी पॉटरच्या हॉगवर्ट्स शाळेची आठवण झाली होती. उंच सुंदर भव्य विटकरी इमारत, खूप मोठय़ा पायऱ्या, लांब कॉरिडोर्स, मोठ्ठी लायब्ररी, हुशार, सुंदर, प्रेमळ शिक्षक.
एक नवीन जग माझ्यासाठी उघडलं गेलं. पहिल्यांदाच जेव्हा पायरीवर बसून एका माझ्याच वर्गातल्या जोडप्याला मिठीत बिनधास्तपणे चुंबन घेताना पाहिलं तेव्हा प्रथम धक्का बसला. पण हसूही आलं. की आमच्या शाळेत या दोघांना किती भीती वाटली असती. इतके दिवस ‘मोकळीक’ या शब्दाचा विचार केलाच नव्हता. असो. तुम्हाला वाटतील ते कपडे घाला, वाटेल त्याच्याशी मैत्री करा, पण अभ्यास आणि वर्गकामाच्या बाबतीत चोख राहा. असं धोरण होतं माझ्या ट्रिम्बल टेक हाय स्कूलमध्ये. मिस्टर स्लोन हे माझे इंग्रजी साहित्याचे शिक्षक इतक्या मनापासून शिकवायचे! हॅम्लेट वाचताना कधी भावनेच्या भरात हॅम्लेटचे वडील येतात त्या सीनमध्ये एकदम टेबलावर उभे राहायचे आणि भुताच्या आवाजात बोलू लागायचे. त्यांनी मला खूप पुस्तकं दिली वाचायला. त्या वर्षांत मी खूप शिकले. नाटय़शास्त्र हा माझा मुख्य विषय असल्यामुळे शाळा संपल्यावरसुद्धा एक-दोन तास आमचा नाटकाचा वर्ग रंगमंचावर रेंगाळायला जायचा. आम्ही स्वप्न पाहायचो एकत्र. प्रत्येकाला वाटायचं रंगभूमीतला फॅण्टम आपल्याला आशीर्वाद देतोय. आमच्या शाळेत अशी समजूत होती की या प्रेक्षागृहात एक फॅण्टम राहायचा, जो सगळ्या अस्वस्थ आत्म्यांना शब्द द्यायला मदत करायचा आणि प्रयोग चांगला झाला तर ती त्याचीच कृपा. फॅण्टम रंगमंचावरून मला अ‍ॅण्टीगॉनचा मोनोलॉग म्हणताना वाटायचं मी थेट त्या फॅण्टमच्या डोळ्यात बघतेय. त्या शाळेत मी एकटीच भारतीय मुलगी होते. त्यामुळे मला मस्त भूमिका मिळायच्या. थोडेसे विचित्र ब्लिथ स्पिरीटमधल्या मादाम आर्कटीसारखे. माझे उच्चार सगळ्यांपेक्षा वेगळे होते. आमच्या मिस पेन्टटनी मला उच्चार कसा करायचा याचं प्रशिक्षण दिलं.
माझ्या दोन्ही शाळा एकमेकांपेक्षा वेगळ्या होत्या. दोन्हीमधलं सौंदर्य वेगळं! दोघांच्या आठवणींचा सुवास एका वेगळ्या जगाची अनुभूती देणारा. दोन्ही शाळेतले शिक्षक आपल्या विषयावर आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे. काही अपवाद अर्थातच आहेत. पण मिळालेल्या अनुभवात हे अपवाद मिळालेल्याचे मोल करण्याची आठवण करून देणारे- हृदय तोडून टाकणारे नाहीत. तळेगावच्या शाळेतला मैदानातला मोठा शिशिराचा वृक्ष, स्वच्छ खिडकीतून येणारी हवा, खो खो खेळताना तुडवली जाणारी सोनेरी धूळ, डबा उघडल्यावर एखाद्याच्या डब्यातल्या बटाटय़ाच्या घमघमाट – आणि टेक्सासमधल्या भव्य वातानुकूलित वर्गामधला मंद पुस्तकांचा वास, लाकडी बेंचवर ठेवलेला चकचकीत स्वच्छ लॅपटॉप आणि वर्गातल्या खिडकीतून दिसणारे स्वच्छ गवत, नीटनेटके रस्ते, शिस्त आणि वेळ या गोष्टींवर अपार श्रद्धा असलेले माझे नाटकाच्या वर्गातले शिक्षक, मित्र, मैत्रिणी.. या दोन्ही शाळांनी माझं जग किती खुलं केलं माझ्यासाठी. दोन्ही जगांत पूर्णपणे समरसून जगण्यासाठी एकच आयुष्य जरा कमीच पडतंय असं वाटतं!

एकटी – नेहा महाजन

(Read more)

सुरूच्या पानांवर पाण्याचे थेंब स्वच्छ स्वप्नांसारखे चमकताहेत. स्वप्नांसारखे सुंदर, आशादायक आणि अस्तित्वाची नव्याने जाणीव करून देणारे. नयनरम्य सकाळच्या अशा लख्ख प्रकाशात एकटीला वेळ मिळणं मला दिलासा देणारं वाटतं.
तो लख्ख प्रकाश म्हणजे उत्कट भावनेचा, विचाराच्या बळाचा, प्रेमाचा आणि समजून घेण्याच्या मनाच्या तयारीचा. मी, माझं मन, माझं शरीर, माझे विचार अशा उन्हात पसरवून ठेवते; शेजारच्या काकू मागच्या टाकीवर चिकाच्या कुरडया पसरवून ठेवतात तशा.
मी माणूस म्हणून जन्म घेतला, अर्थात मी माणूस म्हणून जन्माला आले. माझं त्यात कुठलंही मत विचारात न घेता. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी नवी आहे. प्रत्येक दिवस, निसर्ग, साहित्य, संगीत, राजकारण, धर्म आणि इतर असंख्य गोष्टी ज्या माणूस म्हणून मी अनुभवते; त्या नव्या गोष्टीला चाखून, समजून, प्रश्न विचारून जास्तीत जास्त ती आहे तशी माझ्या आकलनात यावी म्हणून माझा प्रयत्न मला जिवंत असण्याची जाणीव देतो- उन्हात, वाऱ्यात डोलणाऱ्या झाडा-फुलांसारखी.
परवा सिनेमाला एकटीला जावंसं वाटलं. मी गेले. एकच तिकीट विकत घेताना काऊंटर मागच्या माणसाने जरा चमकून बघितलं. एकच तिकीट? मी हसून हो म्हणाले. दोघा-तिघांचे फोन आले सिनेमा सुरू होण्यापूर्वी. त्यांना सांगितलं, मी सिनेमा बघायला आले आहे. ‘एकटी?’, ‘हो’. मला गंमत वाटली. एकटी आल्याचं इतकं आश्चर्य का?
एकदा कॅनडामध्ये असताना एका जंगलात कॅम्पिंग करण्यासाठी म्हणून एका जवळच्या मैत्रिणीबरोबर मी गेले होते. आम्ही आमचा तंबू उभारला आणि त्या सुंदर मेपल वृक्षांच्या जंगलात गडद काळोखात शेकोटी पेटवून बसलो. खूप गप्पाही मारल्या.. माझी मैत्रीण तंबूत काही तरी आणायला गेली तेव्हा अचानक त्या काळोखात विझणाऱ्या शेकटोपाशी एकटं असल्याची सर्वप्रथम भीतीच वाटली. इतका काळोख, शांतता आणि मी एकटी.. या घनदाट जंगलात मला माहीत होतं की माझी मैत्रीण काही वेळातच माझ्याबरोबर असेल. पण तो एकटेपणाचा अनुभव अंगावर काटा आणणारा होता. शांततेची जाणीव करून देणारा.. जंगलातील असंख्य आवाज, काळोख अधिकच गडद करणारी विझणारी शेकोटी आणि काही काळासाठी का होईना माझ्या मैत्रिणीचं माझ्याजवळ नसणं.. ‘एकटं’ असल्याची जाणीव करून देणारं. भीती वाटली सर्वप्रथम, पण क्षणात ती उत्सुकतेत बदलली.
एकटं म्हणजे तरी काय? कारण एकटं म्हणजे स्वत:बरोबरच की! आयुष्य रक्त भिनलेल्या माझ्या स्वत:बरोबर! स्वत:बरोबर संवाद, आपले विचार पडताळून पाहणं, कधी स्वत:वर नाराज, नाखूश असणं असतंच. पण स्वत:बरोबर शांत आणि आनंदात गप्प बसणं किंवा एखादा सिनेमा बघणंसुद्धा किती आनंद देणारं असतं. आयुष्याचं मोल अनुभवून, पचवून त्यात दुसऱ्याला सहभागी करणं हाही एक वेगळा आणि उत्कट आनंद; पण तो स्वत:च एकटीने अनुभवणं हा माझा आवडता माणूसपणाचा प्रत्यय.
कदाचित एकटं असलं की प्रत्येक बारीकसारीक गोष्ट भिंगातून बघितल्याप्रमाणे जाणवते. इंद्रियांच्या जगाची दारं सताड उघडी ठेवून अनेक अनुभव वेगळ्याच अंदाजात डोळ्यांसमोर येतात. मग अशा वेळी वाटतं, ना मी स्त्री आहे, ना मी पुरुष आहे. मी आहे वाटसरू. वाटेचं पिल्लू, वाट शोधत स्वत: वाट होणारं. इतक्या मोठय़ा जगात नंतर असंख्य वाटांमध्ये विरघळून जाणारं..

मिठू

(Read more)

बाबांच्या फॅक्टरीतले एक कामगार- वामन काका एके दिवशी घरी आले. मी नुकतीच शाळेतून घरी आले होते आणि हात-पाय धुऊन बाहेर येताच वामन काका दिसले. त्यांच्या मोठय़ा, कामाने खरखरीत झालेल्या हातात एक पोपट बसला होता. त्याला बघून मी खूप खूश झाले. वामन काकांनी तो माझ्यासाठीच आणला होता. ‘स्िंलग’ ही फॅक्टरी घरचीच असल्यामुळे माझं आणि तिकडच्या कामगारांचं नेहमीच एक गोड नातं होतं. ते मला कडेवर घ्यायचे, झाडाचे आंबे, पेरू, डब्यातली चटणी वगैरे द्यायचे. पण पोपट! मी खूप खूप खूश झाले.
वामन काकांच्या हातातून पोपट माझ्या बोटावर उतरला. त्याचा एक डोळा गेला होता आणि त्याचे पंखही कोणीतरी कापले होते. वामन काकांना तो त्यांच्या बागेत सापडला होता. त्याचं नाव ‘मिठू’ पडलं आणि माझा सहावीत असतानाचा तो सगळ्यात घट्ट मित्र झाला. एका मित्राच्या घरून त्याच्यासाठी पिंजरापण आणला होता, पण आमचा मिठू उडूच शकत नसल्यामुळे आम्ही त्याला पिंजऱ्यात ठेवायचेच नाही. तो माझ्या खांद्यावर असे. सतत खांद्यावर नाही, तर बोटावर. बोटावर नाही तर मी असेन त्या खुर्चीत. नाहीतर माझ्या अगदी शेजारी. मला कधी कसलं रडू आलं तर मी मिठूला जवळ घेऊन आरशासमोर रडायचे. आरशासमोर रडताना पुसटसं बहुधा वाटलं असणार मला, की मोठं झाल्यावर अभिनेत्री व्हायचं.
मिठू माझं जग होता. त्याचं हळूहळू एका डोळ्याने मिर्ची खाणं, ‘‘मिठू!’’ अशी हाक मारली की मान तिरकी करणं, बाबांची सतार ऐकत उगाच आरडाओरडा करणं, माझ्याच खांद्यावर हक्काने आणि प्रेमाने बसणं मला खूप आवडायचं. त्याच्या पायाच्या नखांनी माझ्या हातावर इतके ओरबाडे झालेले असायचे, पण शाळेत गेल्यावर मिठूची आठवण माझ्या हातावरच्या ओरखडय़ांनी जपली जायची.
मला तर अभिमान वाटायचा त्याचा. एक छोटासा पोपट माझ्यावर किती विश्वास टाकतो. त्याच्या छोटय़ा हिरव्या मऊ डोक्यावरून अलगद हात फिरवला की त्याचा एक डोळा आनंदानं मिटायचा.
आमच्या कॉलनीतले सगळे कुत्रे आमच्या मित्र- मैत्रिणींच्या ‘गँग’मधले होते. का आता आठवत नाही, पण एका कुत्रीचं नाव आम्ही ‘वेलणकर’ ठेवलं होतं. वेलणकर गेली तेव्हा माझ्या अभिराम नावाच्या मित्राला सगळ्यात दु:ख झाल्याचं आठवतं. त्याची लाडकी होती ती. त्याच्याच घरामागे पुरलं आम्ही तिला. तर ह्या आमच्या ‘गँग’नी मिठूचा एक वाढदिवसही साजरा केल्याचं आठवतं. सुमितनं तर मिठूसाठी गिफ्ट म्हणून लाल मिरचीपण आणली होती. आमच्यापेक्षा वयाने थोडा मोठा आणि तसा आम्हाला फार न आवडणारा एक मुलगा होता. त्याला रडून रडून सांगितलं तरी तो गिलवरीनं छोटय़ा चिमण्या मारायचा. मग मला खूपच दु:ख व्हायचं आणि आमच्या बदामाच्या झाडाखाली मी त्यांना व्यवस्थित खड्डा करून पुरून टाकायचे, एक मोगऱ्याचं फूल ठेवून द्यायचे. पण मिठू ह्यचाही लाडका होता.
एकदा शाळेतून घरी येताना दादाचा मित्र भेटला. दादा सेकंडरी शाळेत असल्यामुळे माझी शाळा सुटली की मग त्याची भरायची. तो मला म्हणाला, ‘‘तुला कळलं का? तुझा मिठू गेला. त्याला मांजराने मारलं.’’ माझ्या आयुष्यातलं ते सर्वात घाबरवून टाकणारं वाक्य होतं. त्याचा आवाज आत्ता लिहितानाही आठवतो. मी ढसाढसा रडायलाच लागले. दादा मागून सायकलीवर येत होता. मला रडताना बघून मित्रालाच रागवला. कशीबशी माझी समजूत काढली त्याने आणि मी रडत रडतच घरी परतले.
माझ्या आयुष्यात आजही मिठूच्या नसण्याची पोकळी आहे. त्याच्या असणाऱ्या आठवणींनी भरलेली हळूहळू आयुष्यातून अशा अचानक निघून जाणाऱ्यांची संख्या वाढतच गेली. कोणी असा अचानक निघून गेला की काळजाला मोठ्ठी चीर गेल्यासारखंच वाटतं.
पण आज सकाळी पाऊस थांबल्यावर बागेत गेले तेव्हा एक गुलाबाची कळी दिसली. नेहमी कळीखाली असलेल्या हिरव्या छोटय़ा पाकळ्यांनी अजून गुलाबाच्या लाल पाकळ्या घट्ट आत चंबू करून धरलेल्या. एक छोटीशी चीर ह्य पाकळ्यांनाही गेलेली. त्या गुलाबाची कळी आत्ता रात्रीपर्यंत पूर्ण उमललेली होती. मला वाटलं, आपल्या आयुष्यातली दु:खं ह्य हिरव्या पाकळ्यामधल्या चिरेसारखीच तर असतात!
चीर वाटे-वाटेपर्यंत आयुष्याबद्दल वेगळं काहीतरी उजमत जातं- आपलंच आयुष्य फुलत असतं. त्या गुलाबाच्या कळीसारखं.

प्रवास – नेहा महाजन

(Read more)

विद्यापीठात एम.ए.च्या पहिल्या वर्षांत असताना मला माझी सगळ्यात जवळची मैत्रीण भेटली. स्टेफी. कॅनडाहून भारतात एम. ए. करायला आली होती. आमच्या तत्त्वज्ञानाच्या वर्गात विविध देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप असे. देशातल्याही वेगवेगळ्या प्रांतांतून आलेले लोक असत. अर्थात वर्ग छोटासा होता. जेमतेम वीस जणांचा. पण त्यामुळे आमच्यातली मैत्री, विषयावरच्या गप्पा आणि एकत्र अभ्यास करणंही व्हायचं.
सेमिस्टर पूर्ण होत असतानाचा आमचा अभ्यासाचा भार वाढे – असाइन्मेंट्स, सबमिशन्स, थेसिससंदर्भातल्या मीटिंग्स वगैरे. असे दोन आठवडे जयकर ग्रंथालयात, अनिकेत कॅन्टीनमध्ये खूप चहा पिऊन मग पुन्हा वर्गात, कोणाच्या घरी, एकटय़ा – एकटय़ाने काम करत गेले होते.
आम्ही आदर्श कॅन्टीनच्या मोठय़ा वडाच्या झाडाखाली दमून असेच शांतपणे चहा पीत होतो. मी आणि स्टेफी टेबलावर डोकं ठेवून थोडेसे कंटाळून गप्पा मारत होतो. मी सहज म्हणाले, ‘‘चार- पाच दिवस कुठेतरी प्रवासाला जायचं आपण?’’ स्टेफी पटकन खुर्चीत उठून बसली आणि म्हणाली ‘‘चल’’ ‘‘अगं पण कुठे, कसं?’’ ‘‘चल तर माझ्या खोलीत जाऊ, बजेट ठरवू आणि खरंच जाऊ. वी डिझर्व इट.’’ आमचे आणखीन काही मित्र- मैत्रिणी बसले होते- ते म्हणाले तुम्हीच जा. खरंतर मीही सहज बोलून गेले होते. इतक्या पटकन त्यावर आम्ही काहीतरी करू असं वाटलंच नव्हतं.
पण स्टेफीचं हेच मला अजूनही खूप आवडतं. काहीतरी मनापासून करावंसं वाटलं तर त्याला आधी ‘नको’, ‘जमेल का?’ असं तिचं कधीच नसतं. आता ती ‘एज्युको’ नावाच्या कॅनडातल्या एका ‘एक्स्पीरेन्शिअल अ‍ॅण्ड आउटबॉण्ड लर्निग’च्या संस्थेत काम करते. मी मागच्या वर्षी इतर काही कामांसाठी टोरोटोमध्ये गेले होते. तेव्हा होते- नव्हते ते पैसे साठवून मला भेटायला ती व्हॅन्कोव्हरहून टोरेन्टोमध्ये आली! म्हणजे समजा एखाद्या मैत्रिणीला तीन दिवस भेटण्यासाठी कलकत्त्याहून केरळला येण्यासारखं आहे ते.
तर आम्ही ठरवलं हंपीला जायचं. माझे वडील नुकतेच हंपीत राहून आले होते. त्यांच्या प्रवासामुळे मलाही कुतूहल वाटलं होतं त्या जागेचं. म्हणून मग मी आणि स्टेफीने त्या दुपारी हंपीला जाण्याचं बसचं तिकीट काढलं.
यापूर्वी मी खूप प्रवास केला होता. मनाली, टेक्सा, बल्गेरिया, आई-बाबांबरोबर सुट्टीतल्या ट्रिप्स, पण स्टेफीबरोबर हंपीला जे पाच दिवस घालवले, त्यात आम्ही इतकं मनसोक्त जगलो! आमच्याकडे स्लीपिंग बॅग्स, अगदी मोजके कपडे आणि किरकोळ पैसे होते. हंपीच्या पाच दिवसांत होते ते पैसे संपल्यामुळे आम्ही येताना चक्क ट्रकने आलो. दोन तास ट्रकमध्ये त्या मस्त ट्रक चालकाशी आयुष्याच्या गप्पा मारत आम्ही आनंदात परत आलो. त्याने मध्ये एका ढाब्यावर गाडी थांबवली. उंच गोरी स्टेफी आणि मला बघून तिकडचे लोक थोडेसे आम्हाला निरखत होते, पण आम्ही हसून मांडी घालून जेवायला लागल्यावर त्यांनाही गंमत वाटली. भारतात दोन तरुण मुलींनी असं फिरायला जायचं म्हटल्यावर कोणीही आधी काळजी, नको, सुरक्षितता इत्यादी गोष्टी आणून आम्हाला परवानगीच दिली नसती. पण प्रवासाला बाहेर पडल्यावर मी शिकले ते लोकांवर विश्वास ठेवणं. चांगले लोक नक्की खूप आहेत. आपण सावध असणं वेगळं आणि भयभीत असणं वेगळं. आताच्या आपल्या वास्तवातसुद्धा चांगूलपणा असतोच आणि त्याच चांगूलपणाच्या निष्ठेवर मी आजवर प्रवास केला आणि खूप खूप शिकलेच की!
तर हंपी हे कर्नाटकातलं सगळ्यात जुनं शहर. युनेस्कोच्या अंतर्गत हंपीला वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये गणलं जातं. त्या शहराचं वैशिष्टय़ म्हणजे तिथे असलेल्या पडक्या जुन्या राजवाडय़ांचे आणि मंदिरांचे अवशेष, एका अतिशय सुंदर, उज्ज्वल, विशाल काळाची आठवण करून देणारे. तिथे पहिल्या दिवशी गेलो तेव्हा आधी एक छोटं हॉटेल शोधलं. एका रात्रीचे पैसे भरले आणि भाडय़ाने सायकली घेऊन पूर्ण हंपी शहर बघायला निघालो. आमच्या दोघींनाही ‘माणूस’ या प्राण्याबद्दल प्रचंड कुतूहल असल्यामुळे आम्ही ते अवशेष बघत असताना एक वेगळा काळ डोळ्यासमोर उभा राहात होता आणि ही माणसं कशी जगली असतील या विचारात आम्ही गप्पा मारत भटकत होतो. हंपीच्या ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टी पुस्तकात वाचून अधिक शिकण्यासारख्या वाटल्या, पण माणूस असण्याचं अद्भुत भाग्य वाटावं असा तो परिसर होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी ठरवलं की तुंगभद्रेच्या पलीकडे जाऊन ‘अनेगुंडी’ नावाचं गाव आहे. तिथे केळीच्या बागा, शेती, अंजनाद्री डोंगर आहे. तिथे जावं. आम्ही दोघी केळीच्या पसरलेल्या बागांमधून चालत जात होतो. कोवळा सूर्यप्रकाश अनुभवत, शेतीचा सुवास आणि वाऱ्याची गाणी ऐकत. गप्पा मारत चालत असताना एक सुंदर तळं समोर दिसलं. आम्ही हंपी सोडल्यापासून वर्दळ खूपच कमी झाली होती. पर्यटकांची गर्दी केळीच्या बागा बघायला नक्कीच नव्हती! आम्ही दोघीच त्या निळ्याशार पाण्याकडे बघत होतो. स्टेफी म्हटली ‘‘चल पाहू!’’ आणि मी काही म्हणायच्या आत स्टेफी पाण्यात. तिचं ते रूप बघून मला तिच्यातल्या जगण्याच्या ऊर्मीबद्दल प्रचंड प्रेम वाटलं. मी खरंतर पाण्याला थोडीशी घाबरते. पण तरीही उन्हात, निळ्या पाण्यात, जगात दुसरं काहीच नसल्यासारख्या वातावरणात त्या दिवशी पोहत असताना आम्हाला दोघींना मासोळी झाल्यासारखं वाटलं होतं. एक तास पाण्यात डुंबलो आणि जरा वेळ खडकावर बसून तो आसमंत प्रत्येक श्वासातून आत घेतला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली.
थोडंसं पुढे गेल्यावर मात्र आम्ही एक पाटी पाहिली. ‘क्रोकोडाइल्स इन द रिझर्व्हॉयर’! बापरे! आम्ही स्तब्ध झालो. घाबरलोच! आम्ही मनसोक्त पोहत असताना मगरी होत्या त्या पाण्यात! आम्हाला बघितलं असेल त्यांनी? आम्ही खूप हसलो, घाबरलो, आपलं चुकलं असं वाटलं पण त्या दिवशी रात्री अंजनाद्रीच्या डोंगरावर बाहेर स्लीपिंग बॅग्समध्ये झोपून चांदण्या बघत असताना वाटलं की आपल्याला नवीन आयुष्य मिळालंय.
मी आणि स्टेफीने पुढचे सगळे दिवस असेच भरपूर चालून, वेगवेळ्या लोकांशी मैत्री गप्पा करत घालवले. उगाच एकदा एका ट्रॅक्टरला लिफ्ट मागितली. अंजनाद्रीच्या मंदिरातल्या त्या बाबांनी (आम्ही त्यांना बाबाच म्हणायला लागलो.) आम्हाला मंदिरात राहण्याची परवानगीही दिली. ते बाबा तर फारच गमतीदार होते. सुटलेल्या पोटावर लुंगी बांधून पूजा करून दिवसभर टी.व्ही.वर हिंदी सिरियल्स बघत बसायचे. पण खूपच प्रेमळ होते. त्यानंतर कित्येक र्वष त्यांचा फोन यायचा मध्येच, त्या ट्रक चालकाचासुद्धा! मध्यरात्री कुठली तरी आरती असायची त्या मंदिरात. सगळे मंदिरात जमायचे आणि जोरजोरात घंटा वाजवत कुठला तरी मंत्र म्हणायचे. मी आणि स्टेफी झाडावर बसून खाली दरीत बघायचो, त्या आरतीचा आगळावेगळा आवाज त्या अंधाऱ्या थंड रात्रीतली शांतता दूर करायचा आणि नंतर उरायची ती गडद शांतता. मी आणि स्टेफीने एकमेकांना वचन दिलंय की ऐंशी वर्षांच्या आज्ज्या झाल्यावरही असाच प्रवास करत राहायचा!
प्रवास कशासाठी करायचा? नवीन बघणं, अनुभवणं, वेगळ्या लोकांची राहणी, भाषा, अन्न- वस्त्रांची पद्धत बघणं हे तर आलंच. पण मी कोण आहे? या प्रश्नापासून दूर कसं जाणारं?
असंच एकदा झी टॉकीजवरच्या ‘टॉकीज लाइटहाऊस’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान महाराष्ट्रातल्या एका छोटय़ा गावात गेले होते. कॅमेरा लागेपर्यंत मी एका कट्टय़ावर बसून डोंगर, पक्षी, झाडं आणि समोर वाहणारा सुंदर ओढा बघत होते. माशांची शिकार करायला रंगीबेरंगी खंडय़ा बसला होता समोर. रस्त्याच्या बाजूला एक गाडी येऊन थांबली. त्यातून एक माणूस उतरला आणि फोन हातात धरून फोटोच काढू लागला. त्याच्या पाठोपाठ त्याचं कुटुंब उतरलं- दोन बायका, एक त्याचा भाऊ किंवा मित्र असावा, एक आज्जी आणि दोन लहान मुलं. सगळे उतरून फोटोच काढत होते. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी, पाण्यात खेळतोय आपण आणि किती मज्जा येतेय अशी पोझ देऊन ती दोन छोटी मुलं मात्र पाण्यात खरंच खेळत होती. वरती उडणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजात त्यांचाही आवाज मिसळत होता, त्यांनी तिकडले दगड पाहिले. एकमेकांना दाखवले, पाण्यात उतरले आणि ह्य मोठय़ा लोकांचे फोटो काढून झाल्यावर तिसऱ्या मिनिटाला ते निघाले. त्या दोघा मुलांना अजून थांबायचं होतं. पाण्याकडे नजर वळवून ते परतले. आणि मीही त्या सुंदर ओढय़ाचा फोटो न काढायचंच ठरवलं.
माझं तर कामही असं आहे की त्यात प्रवास आलाच! अभिनेत्री म्हणून तर प्रवास करणं मला आणखीन आवडतं. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकरांबरोबर मी माझी पहिली फिल्म केली- ‘बेवख्त बारीश’. त्यांच्या शूटिंगसाठी आम्ही राजस्थानात चकसामरी नावाच्या छोटय़ा गावात गेलो होतो. मी ‘अंगुरी’ नावाच्या एका साध्या गावातल्या, लाजाळू मुलीचं काम करत होते. सुमित्रा मावशींनी पहिल्या दिवशीच मला घेऊन तिकडच्या लोकल बाजारात जाऊन, माझ्यासाठी तिकडच्या मुलींसारखा साधा परकर-पोलका घेतला. आणि मला त्या गावात फिरून यायला सांगितलं. मी परकर-पोलका घातला, वेणी बांधली आणि गेले. त्या मुलींसारखा पदर ओठात पकडला, त्यांच्याचबरोबर उकिडवं बसून त्यांच्या आयुष्याला जवळून बघायची संधी मिळाली. सुमित्रा मावशींबरोबर असंच एका ओरिया फिल्मसाठी आम्ही ओरिसातल्या सुंदर आदिवासी जंगलात राहिलो होतो. सूर्यास्त झाला की त्या दरीतल्या जंगलातला प्रकाश गायब- फक्त उरतो तो कंदील आणि शेकोटीचा प्रकाश. ते सगळे आदिवासी लोक त्या शेकोटीभोवती अनेक तास नाचत. मीही नाचले त्यांच्यात. ‘जीबोन संबाड’मध्ये आहे तो नाच.
आणि मागच्याच वर्षी ‘वन- वे -तिकीट’च्या चित्रीकरणासाठी मी गेले. इटली, फान्स, स्पेनमध्ये जाणाऱ्या एका मेडिटेरियन क्रूझवर. तिथे माझाही वेश बदलला. मी आता ओरिसातली किंवा चकसामरीतली गावंढळ मुलगी नसून या क्रूझची सवय असणारी नायिका झाले! मग काटय़ा-चमच्याने खाणं, अतिशय अदबीने दुसऱ्याला ‘‘गुड मॉर्निग!’’ म्हणणं, आपल्या शरीराविषयी प्रचंड कम्फर्ट असून पोहायला जाणारी माणसं बघणं, यात मी शोधत राहिले एका मस्त वेगळ्या संस्कृतीचा विचार. चकसामरी, ओरिसा, इटली, अमेरिका असो वा कॅनडा- माणसं तर सगळीकडेच आहेत. पण किती वेगळेपणा आहे त्यांच्या प्रत्येक सवयीत.
मला वाटतं या अनुभवांमुळे एक सतत आठवण होत राहते की आपल्या आयुष्याखेरीज या पृथ्वीतलावर शेकडो अशीच माणसं राहतात. निसर्ग, प्राणी, वेगळेपणा याला अंत नाही. आणि त्यामुळेच जितका प्रवास करू तितके आपण ‘माणूस’ होऊ- या त्या जातीचे, धर्माचे, गावाचे, शहराचे, देशाचे न राहता- एक परिपूर्ण माणूस. दुसऱ्याबद्दल मनात प्रेम आणि आस्था असलेला.

शोध…

(Read more)

आज सकाळी जवळच्या एका शाळेतून येणारे राष्ट्रगीताचे सूर कानावर पडले. माझ्या डोळ्यांसमोर आम्ही जीव तोडून मोठय़ांदा शाळेत राष्ट्रगीत म्हणायचो ते आलं. राष्ट्रगीत ऐकताना मला नेहमी काही तरी उत्कट जाणवे. देशासाठी काही तरी केलं पाहिजे, देशाला आपला अभिमान वाटावा वगैरे. सिनेमागृहात राष्ट्रगीत ऐकतानासुद्धा उगाच डोळ्यात पाणी येत असे. एकदा मी कुठे तरी वाचलं होतं की, भारताचं राष्ट्रगीत इतर देशांपेक्षा यासाठी वेगळं आहे की, त्यात कुणा शत्रूविषयी किंवा लढाईविषयी काहीही नसून केवळ भारताच्या सौंदर्याला प्रेमाने न्याहाळणारं हे टागोरांनी रचलेलं प्रेमगीतच आहे जणू. पण राष्ट्रगीत ऐकताना-म्हणताना आपल्या मनात नेमकं काय असतं?
लहानपणापासून सगळ्यांनाच देशाविषयी अभिमान वाटावा असं कुठे तरी शिकवलं जातं. शाळेत साजरे होणारे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवसांत तर स्वदेशाभिमानाचा माहौल असायचाच आमच्या शाळेत. झेंडा फडकवताना सॅल्यूट करणं, अदबीने एका ठिकाणी चुळबुळ न करता उभं राहणं यात देशाविषयी आदर असावा असं शिकवलं जायचं. आमच्या शाळेबाहेर एका ब्लॅकबोर्डवर लिहिलेला ‘आय डोन्ट लव्ह माय कंट्री बीकॉझ इट इज बिग, बट बिकॉझ इट इज माइन.’ असा ‘सुविचार’ आठवतो.
आता वाटतं की, अभिमान, आदर, भक्ती या सगळ्या भावना खरंच मूलभूत, आपण या देशात जन्माला येतो म्हणून असतात का? ‘भारतीय’ असणं म्हणजे काय? या राजकीय-भौगोलिक सीमांमध्ये जन्माला येणं म्हणजे ‘भारतीय’ का?
आज जगात राष्ट्रीयत्वाबद्दल अनेक स्तरांवर वेगळे वाद, मतं, आणि उलाढाली सुरू आहेत. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य नागरिकाने ‘राष्ट्रीयत्व’ असं म्हणणं यालादेखील वेगवेगळे अर्थ दिले जाऊ शकतात. माझ्या मनात मात्र आपल्याला ‘माणूस’ म्हणून बघता येण्यासाठी स्त्री, पुरुष, देश या सगळ्या सामाजिक घटकांची माझ्या परीने, एक वैचारिक प्रयोग म्हणून तपासणी करावीशी वाटते. कदाचित या प्रयोगातून मला अनेक गोष्टी माहिती नाहीत, कळत नाहीत असं उघडकीला येईल- पण निदान तेवढं उघडकीला तरी येईल आणि पुढे त्याचं काही तरी करता येईल, करावसं वाटलं तर.
‘भारतीयपणा’ म्हणजे काय या प्रश्नाची पुन्हा चुळबुळ सुरू झाली ती नुकतीच मैत्री झालेल्या आदिमुळे. हा माझा मित्र मुंबईजवळील गोवंडीत पहिली चौदा वर्षे राहिला. त्याचे आई-वडील कॅनडामध्ये शिकत होते, तेव्हाच त्याचा तिथे जन्म झाला. म्हणून त्याचा पासपोर्टही कॅनेडियन झाला. त्याची अकरावीची अ‍ॅडमिशन घेताना त्याच्या आई- वडिलांच्या हे लक्षात आलं. गंमत म्हणजे त्याला इतकी र्वष माहितीच नव्हतं की तो भारतात ‘एनआरआय’ म्हणून राहत होता. मग काही भयानक ‘डिपोर्टेशन’ वगैरे व्हायच्या आत तो परत कॅनडाला गेला. आता तो दहा र्वष तिथे शिक्षणासाठी राहिला आहे.
त्याला भेटल्यावर तीव्रतेने जाणवली ती भारतीय असण्या-नसण्याची गंमत. आम्ही इंग्रजीतून गप्पा मारतो. कारण तो गोवंडीत राहिला असला तरी त्याची आई कानडी आणि बाबा तेलुगु आणि मराठी गमतीदार! त्याच्या कॅनडामधल्या मित्र-मैत्रिणींशी तो जे इंग्रजीत बोलतो, ते मात्र कॅनेडियन अ‍ॅक्सेंटमधलं इंग्रजी. सोळा वर्षांचा असताना तिथे गेल्यामुळे तोही त्या संस्कृतीत मिसळून गेला. मीही अमेरिकेत गेले तेव्हा सोळा वर्षांचीच होते आणि तेव्हा पहिल्यांदाच माझ्यावर स्वत:ची ‘भारतीय’ अशी ओळख करून द्यायची वेळ आली. आदिसुद्धा कॅनडात जन्मून, इतकी वर्षे तिथे राहून, त्याची ओळख ‘भारतीय’ म्हणूनच होते. ओळख कशी का होईना- कॅनडामध्ये तो भारतीय, आणि भारतात कॅनेडियन!
म्हणजे खरं तर त्याचं भारतीय किंवा कॅनेडियन असणं मधे कुठे तरी धूसर होतंच ना? आपण झाडांसारखे एकाच ठिकाणी आयुष्यभर उभे नाही राहत. विचारांची, संस्कृतीची देवाणघेवाण करत मोठे होत राहतो. नवीन भाषा, शिकत, प्रवास करत, स्वप्न बघत, ज्ञान मिळवत राहतो.
तरीसुद्धा आपली ‘ओळख’ कुठल्या देशाच्या सीमेवर अवलंबून नसते. आपल्या वातावरणात त्या देशाच्या अनेक घटकांचे परिणाम असतात आणि म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्याची छापही असते. पण सगळंच बदलत असतं; तर आपणही तितकेच बदलत असतो.
म्हणूनच मला वाटतं, राष्ट्रगीत म्हणत असताना आपल्या देशाबद्दल प्रेम वाटणं वेगळं.. पण केवळ विशिष्ट देशाचे नागरिक आहोत म्हणून त्या देशाबद्दल अभिमान वाटण्याला फार अर्थ नाही. सॉक्रेटीस ग्रीक होता. मग बेथोवेन जर्मन, मायकेल अँजेलो इटालियन, शेक्सपीअर इंग्लिश आणि किशोरी आमोणकर भारतीयया व्यक्तींबद्दल अभिमान वाटतो, असं म्हणणारे आपण तरी कोण?
आपल्या मुळांबद्दल आकर्षण वाटणं वेगळं, आपली मुळं म्हणजे आपल्याला मिळालेला माणूसपणाचा वारसा, त्यात ‘राष्ट्रीयत्वा’ला कितपत अर्थ उरतो कुणास ठाऊक? मला वाटतं; तो तसा ढोबळच असतो.
काही सौंदर्याचे अनुभव (aesthetic experiences) विशिष्ट देश-विदेशाचे असू शकतात. जशी तळेगावची कोथिंबीर, तिचा गर्द हिरवा रंग, गावरान वास इतर देशात नाही. पण मेपलसारखा वृक्षसुद्धा महाराष्ट्रात नाही. माणसांचं तसं नसतं बहुधा. या सौंदर्याच्या अनुभवातून एका विशिष्ट देशाची ओळख भासू शकते. जसं राग-संगीतात जो विलक्षण वेगळेपणा आहे. किंवा प्रत्येक देशाच्या तत्त्ववेत्त्यांमध्ये भाषेच्या वापरात, विचारात एक विशिष्ट रचना असते किंवा इतर कलांमधून जी अनुभूती होते त्यात एका विशिष्ट भौगोलिक ठिकाणी उगम झाला तरी त्यातून मिळणारी वैश्विक प्रचीती आपल्याला जास्त भावते. आपण कधी म्हणू का, की राग यमन भारतीय आहे? तरीपण भारतीयपणा कुठे तरी असतो आणि नसतो. तो नेमका काय?
नेमकं असं काहीच नाही.
शोधत शोधत फिरणंच बरं.

AUDIO : सेलिब्रेशन – नेहा महाजन

(Read more)

आमच्या मैत्रबन नावाच्या वास्तूची, शेतीची देखरेख सुनीता आणि सतीश गेली अनेक वर्षे करीत आहेत. कुठल्या खांडे- कुसुर गावच्या डोंगरात वाढलेली, साप, बेडूक, उंदीर या कुठल्याच गोष्टींना किंचितही न घाबरणारी, अनवाणी शेतात चालणारी आणि सतत काम करू पाहणारी आमची सुनीता. तिच्या पहिल्या मुलाचा जन्म १ जूनला झाला. तीन वर्षांपूर्वी. तिने मलाच त्याचं नाव ठेवायला सांगितलं. १ जून म्हणजे पाऊस सुरू व्हायचे दिवस असल्यामुळे मी त्याचं नाव मल्हार ठेवलं. हा मल्हार आता शाळेतही जाऊ लागलाय. आज मैत्रबनात गेले तेव्हा आमचं भाताचं शेत मस्त वाढलं होतं, पाण्यात चिंब भिजलं होतं. पावसामुळे सगळंच हिरवंगार झालंय पुन्हा. झाडांना नवीन पालवी फुटली आहे, अनेक रंगांचे, आकारांचे, आवाजांचे असंख्य किडे, माश्या, बेडूक बाहेर आले आहेत. आमच्या फणसाच्या पूर्णपणे निष्पर्ण झालेल्या झाडालाही नवीन, सुंदर पानं आली आहेत. खरोखरच सगळं जिवंत आणि नवीन झाल्यासारखं वाटतंय. म्हणूनच श्रावण महिन्यात इतका आनंद, उत्साह आणि सणांची रांग असावी.
या नावीन्यात डुंबत असताना मला एकदम जाणीव झाली ती काळाच्या प्रवाहाची. प्रत्येक पावसाळ्यात झाडं वेगाने वाढताहेत, छोटासा मल्हार शाळेत जाऊ लागलाय आणि इतके दिवस सुंदर, कडकडीत तपकिरी असलेली जमीन पूर्णपणे वेश बदलून हिरवीगार झाली आहे. आपण किती क्षणात पुढे जाऊन श्रावणाची तयारी करायला लागतो. काही तरी संपतं आणि काही तरी सुरू होतं आणि हे चक्र सतत सुरूच. म्हणजे प्रत्येक नवी पालवी फुटत असताना ग्रीष्माचा परिणाम विरत असतो आणि आपण मात्र ग्रीष्माला काय वाटेल याचा विचार न करता श्रावणात किती दंग होतो. अर्थातच यात चूक-बरोबर काहीच नसेल, आपलंही आयुष्य तसंच तर आहे!
मल्हारच्या शाळेला आज सुट्टी मिळाली. का, तर गावच्या सरपंचाचा भाऊ वारला. आणि गावची स्मशानभूमी लहान मुलांच्या शाळेच्या शेजारी! मला या डिझाईनची थोडी गंमत वाटली- लहान मुलांची शाळा, मात्र त्याशेजारी संपलेल्या आयुष्याची स्मशानभूमी.
म्हणजे प्रत्येकच क्षण जगत असताना प्रत्येकच क्षण मरत असतो का खरंच?
शव हे त्याचे जाळू नका हो
जन्मभर तो जळतच होता
फुले त्यावरी उधळू नका
जन्मभर तो फुलतच होता..
या कवितेच्या ओळींची आठवण एकदम झाली.
म्हणजे प्रत्येकच दिवस नवा, प्रत्येक क्षण नवा, साजरं करणं तर मनावर असतं. आम्ही कॉलेजमध्ये असताना कुणी काही कारणाने दु:खी असेल तर म्हणायचो, चल यार, आज दु:ख साजरं करू- कॉपर चोक्सचा चॉकलेट केक आणून. मग मनमोकळं दु:खी व्हायचो.
आमच्याकडे रोज कचरा गाडी घेऊन एक मुलगा येतो. त्याच्या सायकलवर आडवी टोपी घालून मस्त शीळ वाजवत, गाणी म्हणत, घंटा वाजवत लोकांचा कचरा घेत त्याची सकाळ घालवतो. मी सतार वाजवत असताना कुतूहलाने डोकावले एकदा. मी म्हणाले, ‘ये की आत.’ तो आला, बसला, ऐकलं आणि म्हणाला, मस्त आहे! दिवस मस्त जाईल. त्याला मी गेटपर्यंत सोडायला गेले आणि विचारलं, कसं वाटतं रे तुला तुझं काम? मग त्याच्या पडक्या दातांनी हसला आणि एकदम गाणंच म्हणू लागला, ‘‘हसते हसते.. कट जाए रस्ते!’’ लोकांचा कचरा घेण्यातसुद्धा त्याने त्याचा आनंद शोधला होता. तो त्याच्या गाण्यांमुळे लोकांनाही उत्साह द्यायचा.
त्याची सायकलवर कचरा गाडी घेऊन जाणारी आकृती आठवली की मला बरं वाटतं. किती सुंदर जगू शकतो आपण, प्रत्येक दिवशी. शिवाय कधी मन खचलं नसतं तर मात्र किती गजला, काव्यं, पुस्तकं, संगीत, चित्रं, पत्रं जन्माला आलीच नसती. म्हणूनच, साजरा करता येण्यासारखा तर प्रत्येक क्षण.. आनंद आणि दु:ख यामधल्या असंख्य छटा, कदाचित यापलीकडच्या अनेक भावना, विचार, अनुभव- अख्खं आयुष्य चाखून चाखून जगता येण्यासारखं आहे. अगदी बोअरडमसारख्या (Boredom) विषयावरसुद्धा किती काव्यात्मक विचार केलेत अनेक तत्त्ववेत्त्यांनी. माणूस शोधत असतो उत्तरं, पण नाहीच मिळाली तर वेळ आहे का पुरेसा रुसून बसायला?

सगुणा – नेहा महाजन

(Read more)

गेले काही दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आमच्या घरासमोरची जमीन खोदण्याचं काम सुरू आहे. एरवी शांत असलेला परिसर आता त्या खोदण्याऱ्याच्या खडखडात बुडून गेला आहे. एका मोठय़ा बिल्डरने तिथे दोनशे फ्लॅट्सची अपार्टमेंट स्कीम बांधण्याचं काम जोराने सुरू केलं आहे.
दरवर्षी हिवाळ्यात अगदी गेल्याच हिवाळ्यापर्यंत त्याच जमिनीवरून मंद वास यायचा तो मेंढपाळांच्या झोपडीतून येणाऱ्या धुराचा. सकाळ झाली की चूल पेटवून भाकरी, चहा आणि थंडीचा एकत्रित वास त्या धुरातून आमच्या खिडकीपर्यंत यायचा. गेली कित्येक र्वष हे मेंढपाळ तिथे येऊन राहायचे. त्याच भागात एक लहानसं तळं होतं. पावसाळ्यात तिथे असंख्य बेडूक आरडाओरडा करायचे आणि इतर वेळी खूप पक्षीही बघायला मिळायचे. पाणकावळे आपले पंख पसरून उन्हात वाळवताना बसत तेव्हा मीही सूर्याकडे बघत केस मोकळे सोडायचे. आमचा मोती त्यात पोहायचा आणि एक-दोनदा आम्हीही त्यात उडी मारल्याचं आठवतं. मेंढपाळांसाठी ती उत्तम जागा होती. पाण्याचा साठा, मोकळी जमीन आणि जवळच भरपूर गवताचे मळे.
दोन-चार गाढवांच्या आणि खेचरांच्या पाठीवर मावेल इतकं मोजकंच सामान त्या मेंढपाळांकडे असायचं. त्यांची झोपडी म्हणजे चार बांबूंनी बांधलेली त्यावर लांब प्लास्टिकचे शीट्स, नारळाच्या पानांनी आणि गवतांने भक्कम केलेली. सकाळी साधारण शंभर एक मेंढय़ा चरायला जात. त्यांच्याबरोबर अतिशय सुंदर, उभ्या कानांची रानटी कुत्री, त्यांची देखभाल करायला आणि गुलाबी फेटा बांधून, सुंदर साडय़ा नेसून जाणारे त्यांच्याबरोबरचे त्यांचे मालक आणि मालकीण एकदा सहज मी त्यांच्या झोपडीजवळ गेले. तसं लेंडय़ांचं खत घ्यायला वगैरे अनेकदा जायची वेळ आलीच होती. तिथे गेले तर एक अतिशय सुंदर, २३-२४ वर्षांची मुलगी मोकळ्या मैदानात एका फरशीवर गरम पाण्याने आंघोळ करत होती. मला बघून कुतूहलाने हसली आणि तसंच आंघोळ आटपून साडी नेसतच मला विचारलं, ‘‘काय गं?’’
तिचं असं सहज, शरीराबद्दल कुठलाच संकोच न बाळगता नैसर्गिक मोकळेपणाने माझ्याबरोबर असण्यामुळे, मीही आरामात गप्पा मारू लागले. तिचं आयुष्य कसं आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. तिनेही मला माझं नाव चिारलं. मी नेहा असं माझं साधंसुधं नाव सांगितल्यावर तिने ‘‘होय’’ असं उगाच कौतुकानं म्हटलं. तिचं नाव होतं सगुणा. तिची बहीण जाईबाईसुद्धा गप्पा मारायला आली आणि हसत-लाजत आम्ही बराच वेळ एकमेकींचं इतकं वेगळं आयुष्य समजून घेण्याचा प्रयत्न केला. सगुणा आणि जाईबाई दिसायला अतिशय सुंदर, कणखर, बारीक आणि निरागस होत्या. त्यांच्यात निसर्गाच्या इतक्या जवळ असल्यामुळे एक नैसर्गिक प्रखर रानटीपणा होता. देखणा, सहसा मेकअप आणि डिझायनर कपडय़ांमध्ये बघायला न मिळणारा.
त्यांच्याशी बोलून जाणवली ती त्यांच्या आयुष्यात मोकळ्या जमिनीबद्दल असणारी कृतज्ञतेची भावना. काहीच दिवस तिथे राहून, त्यांचं घर तिथे बनवून, पुन्हा काही दिवसांनी दुसरी जमीन भटकत शोधायची. अशी जमीन मिळाल्यावर प्रत्यक्ष कृती करून घर बांधायचं, जमीन आपलीशी करायची अणि सोडून जाताना पुन्हा स्वच्छ करून होती तशी ठेवायची. मेंढय़ांच्या यकृताला त्रास होऊ नये म्हणून कुठलंसं विशिष्ट गवत असतं. त्या गवताला नमस्कार करून जमीन सोडून द्यायची. सगुणाने मला तिने केलेल्या मण्यांची-धाग्यांची माळ दाखवली होती. आपण जगतो, घालतो ते दागिने हे सगळे असे हाताने तयार केलेले पाहून मला हेवा वाटला-त्यांच्या या नैसर्गिक विकाऊ नसण्याऱ्या आयुष्याचा.
ह्य अपार्टमेंट स्कीमचा मार्केटिंगचा माणूस आमच्याकडे आला आणि तिथले फ्लॅट्स कसे आधुनिक आणि उत्कृष्ट आहेत सांगू लागला-फिरायला बाग, मोठी पार्किंगसाठी जागा, एक छोटं व्यायामघर, सुंदर इंटेरियर्स वगैरे वगैरे. माझ्या डोळ्यांसमोर मेंढय़ांमागे पळणारी सगुणा आली आणि एकदम पाणीच आलं डोळ्यांत. तळं बुजवून इतक्या मोठय़ा बििल्डग्स बांधणं काळाची गरज असावी, पण त्या तळ्याबरोबर आणखीन काहीसुद्धा बुजवलं जातंय का? निसर्गाच्या अगदी जवळच सगुणाचं अस्तित्व आणि मोठी पार्किंग स्पेस मिळाल्यावर आनंदी होणारे आपण यात किती मोठे अंतर आहे ना?
त्याच मैदानात कृष्णा नावाच्या मुलाचं छोटं घर होतं. त्याच्याकडे कबुतरं आणि काही गाई-म्हशी होत्या. तो शेण्याच्या गौऱ्या थापत आम्हाला कहाण्या सांगायचा. त्याला म्हणे पक्ष्यांची भाषा कळायची. मी ‘हॅह!’ असं एकदा म्हणले तर त्याने शीळ वाजवून एका पिवळ्या पक्ष्याला बोलावलं. तो आलाही! मी आणि आमची लहानपणीची गँग आश्चर्यचकित होऊन बघत राहिलो. कृष्णा मला खूप आवडायचा. नंतर कुठे गेला कुणास ठाऊक!
मला खात्री आहे अजून पक्ष्यांच्यात रमून गाईचं दूध काढून गाणी म्हणत असेल कृष्णा आणि सगुणा. जाईबाई मोकळं रान शोधत फिरत असतील. आणि मीही जपून ठेवीन त्यांची आठवण खिडकीबाहेर दोनशे फ्लॅटस्ची अपार्टमेंट स्कीम दिसू लागली तरी.

यश-अपयश?

(Read more)

काल जरा वेळ रिओ ऑलिम्पिक्स बघण्यासाठी टीव्ही सुरू केला. टेबल टेनिसची अतिशय इन्टेन्स स्पर्धा सुरू होती. त्या दोघा खेळाडूंचे हावभाव, तीक्ष्ण एकाग्रता आणि जगात फक्त तो छोटा चेंडू महत्त्वाचा आणि त्या भोवती फिरणारं त्यांचं आयुष्य बघून मीही दात-ओठ चावत, मूठ आवळत त्या खेळात रमले. कोणीतरी एक जिंकला तेव्हा केवढा आनंद झाला त्याला. तो जो हरला, तो शांतपणे हात मिळवून त्याच्या कोचपाशी गेला आणि त्याचा रुमाल काढून थोडासा रडला.
आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्समध्ये एक सतरा वर्षांची मुलगी ऑलिम्पिक्समध्ये प्रथमच आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत होती. सुंदर पांढरा ड्रेस घालून आली; पण तिच्या चेहऱ्यावरची भीती जाणवत होती. ती पळत पळत मध्यभागी गेली, पण कदाचित आजूबाजूच्या लोकांमुळे आणि दडपणामुळे थांबली. आणि काहीच न करता, शून्य मार्क्‍स मिळवून परत हताश चेहऱ्याने फिरली. मी विचार करू लागले, किती अवघड असेल या अपयशांना पचवणं. वास्तविक ती ऑलिम्पिक्समध्ये उतरली, कष्ट केल्याशिवाय तिथपर्यंत पोहोचलीच नसती. पण ज्या क्षणाची तिने इतके दिवस तयारी केली त्या क्षणाने मात्र शेवटी साथ दिली नाही. ती नक्कीची खचली असेल. तिचं सांत्वन करायला असतीलच तिचे मित्र-मैत्रिणी, आई-बाबा, कोच वगैरे. कदाचित तिची ती ताकदीने सामोरी जाईल त्या अपयशाला, पण तिच्यामुळे त्या अपयशाचा क्षण मीही त्या क्षणापुरता अनुभवला. असं होतंच ना? एखादं पुस्तक वाचताना नाही का आपणच त्या कथेतलं पात्र आहोत असं वाटू लागतं? माझं तर हमखास असं होतं. थॉमस हार्डीचं ‘टेस ऑफ द डी’उबरविल्स’ (Tess of the D’Ubervilles) हे पुस्तक वाचून झाल्यावर तर कित्येक दिवस माझं नाव मी ‘टेस’ सांगायचे. मग जरी ते पात्र पुरुष असेल जसं ‘कॅच २२’ मधला योसारिअन; तरी मला मी योसारिअन आहे आणि त्याचं सगळं मला समजतंय, तो माझा मित्र का नाहीये असं कित्येक दिवस वाटे. कदाचित अभिनेत्री म्हणून या सवयीचा फायदा होत असावा. पण स्पंजसारखं मधेच असले काही क्षण, भावना लोकांचे हावभाव, बोलण्याची पद्धत शोषून घेणं माझी जुनी सवय आहे. खूप दिवस तळेगावात राहिल्यावर माझ्या लहानपणाच्या सुमित नावाच्या मित्रासारखी मी हसायला लागते. मग आईही हाक मारते ‘‘ए सुमित!’’
तर मी विचार करू लागले ‘यश’ या संकल्पनेचा. अगदी लहान मुलंसुद्धा शाळेत यश-अपयशाला सामोरं जातात, खेळांच्या स्पर्धेत, अभ्यासात, वगैरे. यशस्वी असणं-नसणं सगळ्यांनाच लागू असतं- शाळकरी मुलामुलींपासून, आजी-आजोबापर्यंत. आपणही बोली भाषेत कित्येक वेळा कुणाची ओळख करून देतो ‘हा अगदी यशस्वी व्यवसायिक आहे’ ‘ती अभिनेत्री फार काही यशस्वी म्हणता येणार नाही.’ आणि ‘यशस्वी हो, समृद्ध हो’ असे आशीर्वादही मिळत असतात.
पण यशाबद्दलची मला इंटरेस्टिंग गोष्ट वाटते की खरं म्हणजे यशाला कुठलंच मोजमाप नाही. खूप पैसे, गाडी-बंगला म्हणजे यश का? प्रसिद्ध म्हणजे यश का? मला पाहिजे ते करता येणं म्हणजे यश का? सुंदर प्रेमळ नाती जोडता येणं म्हणजे यश का?
त्या मुलीने आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्समध्ये सुवर्ण पदक मिळवलं नाही, तिने तर तिच्या मूव्ह्जही पूर्ण केल्या नाहीत, पण खरंच ते अपयश आहे का? तिला होणाऱ्या वेदनांवर ती मात करू शकेल; पण त्यात तिचं यशच नाही का?
मला एवढंच वाटतंय की नेमका यश-अपयशाचा अर्थ आपल्यापुरता काय आहे याचा विचार केला तर या संकल्पनासुद्धा प्रत्येकासाठी वेगळ्याच ठरतील. पण आत्ताच्या स्पर्धात्मक वातावरणात जर या संकल्पनांच्या व्याख्या अशाच एकसारख्या इंटरप्रिट केल्या तर मात्र निराशा अधिक वाढेल.
आइनस्टाइनचं वाक्य आठवलं.
”Everyone is a genius. But if you judge a fish on its ability to climb a tree, it will live its whole life beliving that he is stupid.”
पण एखादा मासा कमी-जास्त वेगाने पोहू शकतो. तो कसा जगतो, हेच जास्त महत्त्वाचं, माझ्या मते तरी. माशांच्या स्पर्धेत एखादा वेगात पोहोला तर त्याला जास्त आयुष्य कळलं का?
आपण माणूस म्हणून परिपूर्ण होत रहाण्याच्या प्रवासात, यश- अपयश पुन्हा पुन: पडताळून पाहिलं, तर वेगवेगळे अर्थबोध होत राहतील. आणि मग यश-अपयश या तशा स्पर्धात्मक असल्यामुळे पर्यायाने ताण असलेल्या संकल्पना गळून पडतील आणि (एकदाचे) आपण आनंदात, शोधात, प्रसन्न जगू शकू- जसा तो मासा निळ्याशार पाण्यात डुंबत राहील.
म्हणजे काही मिळाल्याचा आनंद, काही गमवल्याचे दु:ख न होण्याची अपेक्षा नाही, पण त्या आनंदात, दु:खात आपल्या आयुषाचं फुलणं अथवा कोमेजणं असणार, त्याला तोलणारी कुठली ठरावीक यश-अपयशाची व्याख्या नाही. कदाचित तसं झालं तरच निकोप स्पर्धाही असू शकेल, निर्मितीची शक्यता असू शकेल, माझा-माझा खेळ सुधारण्याची वृत्ती असू शकेल-आपोआपच परिणाम बरा होईल बहुतेक.
पुन्हा यातच यश आहे, असं कोणीतरी म्हणणारंच – म्हणजे आपण निर्माण केलेल्या जगात या संकल्पना निर्माण झाल्यामुळे कदाचित त्यांच्यातून सुटका मिळणं अवघडच. पण प्रयत्नात राहिलो तर एक दिवस वेगळा असेल- कदाचित.

स्वचित्र

(Read more)

चित्रपटसृष्टीबद्दल वर्षांनुर्वष मनावर मोहिनी टाकणारं, अगम्य असं काहीतरी वलय असल्याचं जाणवतं. म्हणूनच त्यातल्या तारे व तारकांबद्दल प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल लोकांच्या मनात असतं. कुणी टीव्हीमधला ओळखीचा चेहरा दिसला की शेजारपाजारचे लोक हमखास एकमेकांच्यात कुजबुजू लागतात, मग त्याची/तिची सही घेणं, सेल्फी घेणं, कधी नुसतंच बघत बसणं किंवा काही लोकांबाबतीत ‘त्यात काय एवढं’ असं म्हणून खांदे उडवून निघून जाणं मी स्वत:ही अनुभवलं आहे.
अमुक अभिनेत्रीने विमानतळावर कुठले कपडे घातले, तमुक पुरस्कार सोहळ्यात कोणती केशरचना केली, कुठल्या ब्रॅण्डचे बूट, पर्स, दागिने, नेलपॉलिश, लिपस्टिक या विषयांवर भरमसाट चर्चा करणाऱ्या वेबसाइट्स, मासिकं, गप्पा तर असतातच. आता तर ‘फॅशन पोलीस’सुद्धा असतात. कुणी तेच कपडे दोनदा वापरल्यावर का कुणास ठाऊक, पण हे फॅशन पोलीस गुन्हा दाखल करतात. आणि उलट माझ्या प्रोफेशनबद्दल असंच म्हटलं जातं की अ‍ॅक्टर्स ही जमातच मुळी स्वत:त रमणारी असते- सेल्फ इण्डलजण्ट. आपल्याला किती फॅन्स आणि फॉलोअर्स आहेत, शरीराची, त्वचेची, केसांची, नखांची काळजी घेणं इत्यादी. सिनेमाच्या प्रमोशनच्या काळात मी कुठला श्ॉम्पू वापरते, सकाळी उठल्यावर काय खाते असेही असंख्य प्रश्न विचारले जातात.
अर्थात या सगळ्यांमुळे अभिनेत्यांचं स्वत:कडे खूप लक्ष केंद्रित होतं असं वरवर वाटू शकतं. मला मात्र वाटतं सगळ्यांनाच स्वत:बद्दलही तितकं कुतूहल असतं. कपडे, केस, नखं, त्वचा यापलीकडे आपले विचार, मत, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, संवेदनक्षम व उत्कटपणे अनुभवलेल्या, जगलेल्या गोष्टी – त्यांना व्यक्त करण्याची इच्छा, समजून घेण्याची इच्छा अगदी पुरातन काळापासून स्पष्टपणे आढळते. म्हणजे माणूस म्हणून आपल्या ‘माणूस’ असल्याचं एक प्रकारचं आश्चर्य आणि ‘म्हणजे नेमकं काय हे’ उमजून घेण्यासाठी अनेकांनी किती प्रयास केला आहे! सूर्यास्त बघून अस्वस्थ झाल्यावर कुणाला कविता सुचली असेल तर, डोळे बंद केल्यावर पापणीवर दिसणाऱ्या प्रतिमेचं कुणा संशोधकाला आकर्षण वाटून त्याने ‘परसिस्टन्स ऑफ इमेजेस’ (ढी१२्र२३ील्लूी ऋ ्रेंॠी२)चा अभ्यास करून सिनेमा या कलेची प्रथम बीजे रोवली आहेत. चांदण्या बघताना आपण आलो तरी कुठून, पृथ्वी गोल का सपाट, सफरचंद वर का उडत गेलं नाही? असे प्रश्न पडले नसते तर आपल्याला स्वत:लाच आपल्या जगाबद्दल आणि त्यात असलेल्या माणूस म्हणून आपल्या स्थानाबद्दल कमीच माहिती मिळाली असती.
अनेक मोठमोठय़ा चित्रकारांनी मान्य केले आहे की स्वचित्रे (सेल्फ पोट्रेट्स) हे त्यांच्यासाठी सगळ्यात अवघड जाते. असं का असावं? असा विचार केल्यावर वाटतं खरंच ‘मी कोण आहे’ असं स्वच्छ, स्वतंत्र नजरेनं पारखणं किती दुर्मिळ असतं – किंवा कदाचित खूप अवघड. कारण अमुक एक माझ्याबद्दल काय म्हणतो, लिहितो किंवा मी कपडे, लिपस्टिक कुठली लावली आहे यापलीकडे मी खरंच व्यक्ती म्हणून कोण आहे- माझी मतं, माझ्या भावना, माझ्यातून येणारी कधी कधी आश्चर्यकारक वाटणारी भीती, तसंच माझ्यातून येणारं असहाय प्रेम करण्याची क्षमता, कधी राग, कधी दु:ख, कधी बेदरकार आनंद हे सगळं एकत्रितपणे मला गुंडाळून कुठल्या प्रतिमेत कोंबता येईल हे अवघडच म्हणावं लागेल.
आपल्या सगळ्यांनाच ‘सेल्फी’ किती आवडते. कित्येकांनी प्राण धोक्यात टाकून सेल्फी काढण्याचे प्रयत्न केले आहेत. मला वाटतं या ‘मी’च्या शोधात अथवा आकर्षणाचाच भाग आहे. जसं काही लोक स्वत:बरोबर इन्फॅच्युएटेड असतात. काही स्वत:च्या प्रेमात मात्र काही स्वत:वर प्रेम करणारी. मला वाटतं स्वत:च्या प्रेमात असणं वेगळं आणि स्वत:वर खरंखुरं प्रेम करणं वेगळं कारण प्रेम आंधळं नसतंच! असं आपल्यावर का बिंबवलंय कुणास ठाऊक – प्रेम तर डोळे स्वच्छ उघडणारं असतं – स्वत:वर केलेलं प्रेम आपला स्वत:चा दृष्टिकोन घडवतं.
आई-बाबांनी सांगितलं म्हणून, धर्म-परंपरा आहे म्हणून केलेली गोष्ट आणि स्वत:च्या रॅशनल विचाराने स्वतंत्रपणे दुनिया पडताळून आपला मार्ग शोधणं यात वेगळा स्वत:चा आनंद असावा.
‘सेल्फीज’मधल्या आनंदातून स्व-चित्राची ओढसुद्धा जपली गेली तर स्वत:बद्दलच कुतूहल वाटत राहील आणि पर्यायाने जगाबद्दल. कारण जगाला सामोरं जाण्याचं ‘मी’ हे माध्यम नेमकं कोण आहे, कसं आहे? ‘मी’ न कुणी छोटा न मोठा. ‘मी’ अनुभवणारा.
‘लोकप्रभा’मुळे मलाही माझे विचार मांडण्याची संधी मिळाली. पहिल्यांदाच असं डेडलाईन असलेलं लिखाण करण्याची वेळ माझ्यावर आली. माझी तळेगावची शाळा इंग्रजी माध्यमाची होती. खरंतर आसपास सगळेच जण मराठी बोलणारे असले, तरी आमच्या शिक्षकांना मनापासून वाटे की आमचं इंग्रजी सुधारावं. भूत मॅडम मुख्याध्यापिका झाल्या तेव्हा मराठीतून बोलणाऱ्याला पाच रुपयांचा दंड होईल अशी बहुधा अफवा पसरवली होती, कारण खरंच कुणी पाच रुपये दिल्याचं मला कधीच आठवत नाही- आणि आम्हीही थोडंफार मराठी बोलायचोच. मात्र इंग्रजीतून लिहिणं, विचार करणं, बोलणं माझ्या खूपच अंगवळणी पडून गेलं. पुढे अमेरिकेत एक वर्ष राहिल्यामुळे ते आणखी अधोरेखित झालं. ‘लोकप्रभा’मुळे मी प्रथमच माझे विचार मराठीतून मांडण्याचा प्रयत्न केला. तो करताना एक वेगळं शिक्षण आणि आनंद मिळाला. आजचा हा शेवटचा लेख. जून ते ऑगस्ट हा सुंदर पावसाळी काळ लेखन करण्यात गेला. माझ्या स्वचित्राच्या शोधावर ‘लोकप्रभा’चा खूप प्रभाव नक्की पडला. त्याबद्दल आभार!